नाते तुमचे आमचे हळुवार जपायचे…तिळगुळ हलव्यासंगे अधिक दॄढ करायचे…तिळगुळ घ्या गोड गोड बोला…मकरसंक्रातीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा तसेच हे नवीन वर्ष भंडारी मंडळ परिवाराला सुख आणि समृद्धीचे जावो.!!

घरकुल

                     आज पर्यंत मोठ मोठ्या विचारवंतांच्या सांगण्यात आलेल्या ओळींमधील एक ओळ, "आपले आयुष्य हि एक शाळा असते." याचा प्रत्यक्ष अनुभव घरकुल भेटीत मिळाला. खरच... आयुष्यात प्रत्येक गोष्ट शिकण्यासाठी शाळा महाविद्यालय प्रवेश घेण्याची आवश्यकता लागतेच असे नाही.... तर आपले आयुष्याच एक मोठी शाळा आहे..... कारण पुस्तकी अभ्यासातून ज्ञान मिळते तर आयुष्य नावाच्या शाळेतून अनुभवाने जगता येते.

घरकुल भेटीपूर्वी मनात असलेली मतीमंद मुलांची कल्पना :-
                    आज पर्यंत मतीमंद मूले म्हणजे थोडक्यात वेडी मुले. जे सामान्य माणसांप्रमाणे वागू बोलू शकत नाही. त्यांना कळत नसते. अशी कल्पना होती. अशांसोबत पूर्ण दिवस कसा काढू आपण याची मलाही मनात भीती होती. कोणी आपल्याला मारणार नाही ना.... आपण त्यांच्याशी कसे खेळू??? असे अनेक प्रश्न मनात होते...
                    परंतु घरकुल मध्ये पोहोचल्या नंतर जेव्हा बर्वे काकांनी आमच्याशी जेव्हा संवाद साधला तेव्हा मनातल्या सर्व शंका आणि भीती संपली आणि आम्ही त्या मुलांना आपल्या बी एम च्या जगात सामील करून घेतले. ही मुले जन्माला येतात आपल्या सारख्या सामान्य माणसांप्रमाणेच. पण त्यांच्या मेंदूची वाढ मात्र फार फार तर ५ ते ६ वर्षांपर्यंतच होत असते. याचा अर्थ असा होत नाही कि ते वेडे असतात. त्यांना ते सर्व कळते जे ५-६ वर्षांच्या मुलांना कळते. पण हया मुलांना सामान्य लोकांमध्ये जगणे थोडे कठीण असते. किंव्वा असे म्हणू कि सामान्य लोक यांना आपल्यात सामील करून नाही घेऊ शकत.
                      अशा परीस्थित आई वडिलांचा ही नाईलाज असतो. त्यांच्या पाश्च्यात अशा मुलांचा सांभाळ कोण करणार हा ही एक मोठा प्रश्न असतो. घरकुल ही संस्था अशाच मुलांच्या पालकांनी मिळून उभी केलेली संस्था आहे. मेजर काळे यांच्या पुढाकाराने या संस्थेची बीजे रुजली गेली. तर त्यांच्या पश्चात श्री. बर्वे यांनी हया शाळेचा कार्यभार सांभाळला. कदाचित या संस्थेच्या आधारामुळे त्यांना ही जगण्याचा आधार मिळाला आहे. संस्था म्हणण्या पेक्षा हया शाळेला मी घर म्हणेन. आणि नाव पण अगदी साजेसे घरकुलच आहे हें.


                         मोठी (वयाने) माणसे म्हंटले कि आठवते त्यांचे आपल्याला ओरडणे, धाकात घेणे, सारखे अभ्यास विषयी बोलणे. पण घरकुल मधल्या व्यक्ती वेगळ्या होत्या त्यांनी सहजपणे आम्हाला त्यांच्यात सामावून घेतले, आम्हाला त्यांचा एक भाग बनवले. आमच्यावर कशा प्रकारची शिस्तीचे बंधन न लादता त्यांनी आम्हाला आमचे आवडते खेळ खेळायला उत्स्फूर्त केले आणि स्व:त हि आवर्जून भाग घेतला. कधी आम्ही जास्त मस्ती केली कि जेवण मिळणार नाही म्हणून आम्हाला दटावत हि होते. तर अश्या आमच्या वडिलधाऱ्या मित्रान सोबत आमचा एक दिवस कसा गेला समजलेच नाही. त्यांनी आम्हाला वेळोवेळी हसवले, त्यांच्यात सामावून घेतले आणि आमच्यातली अनोळखी दुरी मिटवून टाकली.
 

                     बर्वे काकांनी किती सहजपणे एका शब्दात घरकुलच्या यशाचे गमक सांगितले. " tolerance चा आदर "
घरकुलचे कर्मचारी तेथील मुलांचा tolerance चा आदर करतात... त्यांच्या कडे special child या नजरेने न बघता आपल्या मुलासारखे त्यांचे संगोपन करतात .तर अश्या या घरकुलच्या मित्रांना आपलेसे करून त्यांची व्यवस्थित काळजी घेणाऱ्या अमेय पालक संघटनेच्या सगळ्या पदाधिकार्यांना आणि कर्मचार्यांना सलाम.